विभागाविषयी
खनिज संसाधनांची शिस्तबद्ध शोधमोहीम व विकास करणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विभागाद्वारे भूवैज्ञानिक नकाशांकन, खनिज अन्वेषण, साठ्यांचे अंदाज, नियामक कार्य आणि देशाच्या खाण धोरणांसाठी सहकार्य यासारखी कार्ये पार पाडली जातात. खनिज क्षेत्राचे लिलाव पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची जबाबदारीही विभाग सांभाळतो.
नागपूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय हे या विभागाचा कार्यरत संचालनालय असून, देशातील उत्कृष्ट नियोजित संचालनालयांपैकी एक म्हणून याची ओळख आहे. या संचालनालयामध्ये भूविज्ञानीक, ड्रिलिंग अभियंते, रसायनशास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, सर्वेक्षण व नकाशा अधिकारी, सांख्यिकी व लेखा अधिकारी, GIS सहाय्यक, लघुलेखक तसेच इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली कुशल टीम कार्यरत आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा खनिकर्म अधिकारी ( DMO) नियुक्त केलेले असून, ते संबंधित जिल्ह्यातील खाण क्षेत्राच्या तांत्रिक व प्रशासकीय कार्यांची देखरेख करतात. तसेच खनिज संसाधनांच्या व्यवस्थापन व प्रशासनात जिल्हाधिकारी यांना सहाय्य करतात.
खनिज अन्वेषणासाठी विभागाकडे सुसज्ज तांत्रिक कौशल्यासोबत अत्याधुनिक साधने व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. विभागात महाजिओमिन प्रयोगशाळा तसेच विशेष ड्रिलिंग विंग्ज कार्यरत आहेत. याशिवाय, विभागाकडून विविध प्रकारच्या विश्लेषण व तपासणीसाठी रासायनिक प्रयोगशाळा सेवा देखील प्रदान केली जाते.
महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड (एम.पी.सी.एल.) ही संपूर्णतः महाराष्ट्र शासनाच्या मालकीची कंपनी असून, तिची स्थापना इ.स. १९८१ मध्ये पेट्रोकेमिकल उद्योग क्षेत्रात कार्य करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे. राज्यामधील पेट्रोकेमिकल व्यवसायास प्रोत्साहन देणे व त्याचा विस्तार करणे, तसेच पेट्रोकेमिकल क्षेत्रामध्ये विविध व्यवसाय स्थापन करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला व रोजगारनिर्मितीला चालना देणे, हा या कंपनीचा प्रमुख उद्देश आहे.
महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ मर्यादित (एम.एस.एम.सी.) ही महाराष्ट्र शासनाची संपूर्ण मालकी असलेली कंपनी असून, तिची स्थापना कंपन्या अधिनियम, १९५६ अंतर्गत दिनांक १४ नोव्हेंबर, १९७३ रोजी करण्यात आलेली आहे.या कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विविध खाणींच्या नियोजित व प्रणालीबद्ध विकासाला प्रोत्साहन देणे, राष्ट्राची खनिज संपत्ती जतन करणे व संवर्धन करणे हे आहे. तसेच महाराष्ट्र राज्यात अथवा इतरत्र खाणी, खाण हक्क व धातूयुक्त जमिनी खरेदी करणे, भाडेतत्त्वावर घेणे किंवा अन्य प्रकारे संपादन करणे, त्यांचा शोध घेणे, विकास करणे व त्याचा उपयुक्ततेनुसार वापर करणे, ही देखील या कंपनीची उद्दिष्टे आहेत.