ए सी एस डेस्क
श्री. लोकेश चंद्र (भा.प्र.से.)
महाराष्ट्राची खनिज साधनसंपदा राज्याच्या विकासकथेतील पाया आहे आणि भारताच्या आर्थिक प्रगतीत या संपदेचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. या साधनसंपत्तीचा उपयोग कार्यक्षम, पारदर्शक आणि शाश्वत पद्धतीने होईल याची खात्री करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. औद्योगिकीकरणाला चालना देणे, स्थानिक समुदायांसाठी संधी निर्माण करणे आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे... या संतुलित विकासाच्या मार्गाशी खनिकर्म विभाग कटिबद्ध आहे. येथे विकास आणि संवर्धन एकमेकास पूरक आहेत.
खनिकर्म विभागाने, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, ‘महाखनिज’ डिजिटल प्लॅटफॉर्म आणि संबंधित संस्थाद्वारे सेवा व सुविधा पुरवठ्याची सशक्त व्यवस्था राबवली आहे. या एकात्मिक संरचनेमुळे कार्यपद्धती सुलभ व गुंतवणूकदार-स्नेही होत असून त्या पारदर्शक, जबाबदार व उच्चतम अनुपालन मानकांशी सुसंगत होत आहेत. खाणपट्टे मंजुरी प्रक्रिया सुलभ करणे, लिलावांचे आधुनिकीकरण करणे व प्रगत संनियंत्रणाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून गुंतवणूकदारांसाठी सुयोग्य वातावरण निर्माण करत आहोत. तसेच, अवैध खाणकामाविरुद्ध ठामपणे कारवाई आणि देखरेखीची यंत्रणा अधिक सक्षम बनवत आहोत.
खनिकर्माला समावेशक विकासाचा उत्प्रेरक बनविणे हे आमचे लक्ष आहे. जिल्हा खनिज निधींमार्फत मिळणाऱ्या महसुलामुळे खनिकर्म प्रभावित भागातील जीवनमान बदलत आहे; या निधींचा उपयोग शिक्षण, आरोग्यसेवा, पायाभूत सोईसुविधा आणि उदरनिर्वाहाच्या संधी निर्माण करण्यासाठी केला जात आहे. गडचिरोली व चंद्रपूरसारख्या जिल्ह्यांना खनिज-आधारित मूल्यवर्धन केंद्रे म्हणून विकसित करण्यावर भर दिला जात आहे, ज्यात स्थानिक सहभाग, रोजगारनिर्मिती व सामाजिक प्रगती यांना प्राधान्य दिले जात आहे.
खनिज उत्खननापलीकडे, महाराष्ट्रात खनिज आधारीत आधुनिक उद्योग आणि पुढील प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, जेणेकरून राज्यातील स्त्रोत राज्यातच उपयोगात आणुन मुल्यवर्धन होणार आहे. बंदर, महामार्ग आणि औद्योगिक कॉरीडॉरमधील जागतिक दर्जाच्या संपर्क-सुविधांच्या बळावर आम्ही खनिज-आधारित औद्योगिकीकरणासाठी स्वतःला एक मायनिंग हब म्हणून स्थापीत करत आहोत. पर्यावरणीय संवर्धनाची जबाबदारी हा आमच्या विकास कार्यक्रमाचा आधार आहे; पुनर्वसन, वृक्षारोपण, अक्षय उर्जा अंगीकार आणि संसाधन कार्यक्षमता यांवर विशेष भर दिला जातो — हे सर्व ‘विकसित भारत 2047 व ‘विकसित महाराष्ट्र 2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे.
खनिकर्म विभाग अण्वेषण, मंजुरी, संचालन, विस्तार आणि बंद खाणींचे पर्यावरणीय द्रुष्ट्या पूनर्वसन करणे या प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदार व उद्योगांना सहकार्य करण्यास तत्पर आहे. आमचे उद्दिष्ट असे सक्षम व उद्योग्स्नेही वातावरण निर्मिती करणे हे आहे, जेथे जबाबदार खनिकर्म आर्थिक गतिशीलता, समुदाय सशक्तीकरण आणि शाश्वत वाढ यांना चालना देत राहील.
अशा या प्रवासात, जेथे खनिज साधनसंपदा समृद्धी, समता आणि संधींमध्ये रूपांतरित होते तेथे आमच्यासोबत सहभागी होण्याचे, महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचा थेट अनुभव घेण्याचे आणि अशा भविष्य घडवण्यात सहकार्य करण्याचे आम्ही आवाहन करीत आहोत.